तीन वर्षे झाली सुकुमारा ! पाय न घे भूवरी
(चालः हटातटाने पटा रंगवुनि...)
तीन वर्षे झाली सुकुमारा ! पाय न घे भूवरी ।
कुठवरी झोके द्यावे तरी ? ॥धृ०।।
भाग्याने जन्मलास अमुच्या, पांग फेड झडकरी ।
न धरवे धीर मना क्षणभरी ।।
पिता मारला लहानपणि अणि माताही घाबरी ।
दिसू दे दिवस सुखाचे तरी ।।
काय रे काय तुज झाले का सांगना ?
तुज अजूनिया होतात काय यातना ?
मजकडे पाहि तरी जरा, नेत्र उघडिना ।
बोल चिमुकल्या मुखातुनी या, घे उसळी ये वरी ।
कुठवरी झोके द्यावे तरी ? ॥१।।
तुझ्या वयाचे बाळ दुडूदुडू, चालतसे साजिरे ।
पाहता हर्ष मनी नावरे ।।
गोजिरवाणे बोलताति अणि नाव सांगती बरे ।
घरातील लोक होती हासरे ।।
जो जो तुझियाकडे पाहतो, नेत्र तयाचे फिरे ।
लपुनिया म्हणती तू दुःखी रे ! ।।
सांग ना बिमारी काय झाली तरि तुला ।
तू सर्वा आवडता एकुलत्या मुला ।
तुजवरी भिस्त ही देशाची, समजला ?
कोण तुझे चालक अज्ञाना ! कधी व्यवस्था करी !
कुठवरी झोके द्यावे तरी ? ।।२।।
बहु चालक है तुला म्हणोनी, तुझी अवस्था अशी ।
असे हे गमते मम मानसी l
जो तो अपुल्या करी मनाने, झाली अनावर खुशी ।
न येती एकजागी फारशी ।।
मीच शहाणा म्हणोनि जो तो,अपुल्या जागी बसी ।
त्यामुळे तुझी दशा ही अशी ।।
पण जर का ही वाढेल बिमारी अती ।
लागेल काळीमा सगळ्याच्या भोवती ।
घालतील माना खाली भ्रमवुनि मरती ।
पुन्हा कशाचे दिवस सुखाचे! वर्षे गेली जरी ।
कुठवरी झोके द्यावे तरी ? ।।३।l
जगच्चालका ! नवस आमुचा, बाळ सुखी राहु दे ।
भाग्य हे डोळाभर पाहु दे ।
घरोघरी आनंद होउ दे, विघ्न सर्व जाउ दे ।
सुखाने मानाने नांदु दे ।।
सर्व पुढारी, पक्ष पंथ हे एक अता होउ दे ।
देश हा सर्वांना सेवु दे ।।
खेळू दे बाळ चमकु दे, तेज मिळवु दे ।
टपणाच्या शत्रूंचि ती नशा जिरवु दे ।
फिरवु दे जरा तरि चोहिकडे फिरवु दे ।
तुकड्यादास म्हणे प्रगटू दे, चिन्ह अता तरि बरी ।
कुठवरी झोके द्यावे तरी ? ।।४।।