स्वातंत्र्याचा पंचमहोत्सव हर्षाने होऊ दे
(चालः धन्य धन्य गे स्फूर्ति...)
स्वातंत्र्याचा पंचमहोत्सव हर्षाने होऊ दे ।
जन-मना! पाय पुढे जाउ दे ।।धृ0।।
उत्साहाने चढाओढ कर, उद्योगी व्हावया l
भूषवी देश अन्न - धान्यी या ।
कष्ट कराया शीक तरुण-मन देशकायी द्यावया ।
उठ रे ऊठचि जागोनिया ।
शक्ति - युक्ति ही सर्व बाजुनि देशाला सोपवी ।
नको तुज चिंता तुझी आघवी ।
तू आत्मनिरीक्षण करुनि पाही आपणा ।
मी सत्य, देशप्रीय की अन्य पाहणा ।
मी व्यक्ति-सुखी की,मानवतेच्या खुणा ।
उणीव दिसता आत्मचिंतने, हृदय सरळ होउ दे ।
जन-मना ! पाय पुढे जाउ दे ।।१॥
तुझे न धन ते, तुझे न मन ते, तुझे पुत्र ना तुझे ।
सर्व तू देशव्याप्त - हे तुझे ।
कणाकणातुनि उदारतेची वाणी ही गर्जु दे ।
देश सर्वांगिण सुखी होउ दे ।
तयार नसशिल असे म्हणाया, या अज्ञाना दुरी।
कराया संकल्पचि हा करी ।
ही कळकळ मनि येउ दे, प्रभू आस ही ।
मी जसा तसे मम देशबंधु सर्वही ।
स्वातंत्र्य-दिनी या करा प्रार्थनाच ही ।
पक्ष-पंथ अणि द्वेष - भाव हा, समोर नच येउ दे ।
जन-मना ! पाय पुढे जाउ दे ।।२॥
शीक कराया काम, करांना उद्योगी बनवुनी ।
मित्र-सन्मित्र साथि घेउनी ।
ग्रामिण जीवन उन्नत व्हाया, शक्ति पुरी लावूनी ।
भाग्य उदयास येउ दे झणी ।
कधी कुणाला दुःख न होवो, अपुल्या निज हातुनी ।
करी असे चिंतन हृदयातुनी ।
हा दृढ निश्चय व्हावया प्रतिज्ञा करी ।
तरि स्वातंत्र्याची तुझी दिवाळी खरी ।
अन्याय न होवों अंता असा या पुढे तरी ।
तुकड्यादास म्हणे यासाठिच, मरू अणि जन्मु दे ।
जन-मना ! पाय पुढे जाऊ दे ।।३॥