अमर तरिच मी नवस्फूर्तीने, करीन पुरुषार्था
(चाल: उठा गड्या ! अरुणोदय झाला...)
अमर तरिच मी नवस्फूर्तीने, करीन पुरुषार्था ।
अपुला-परका भेद न पाहता, सुखविन दीन-जनता ॥धृ०॥
सकल लोक हे सुखशांतीने नांदो यासाठी ।
जे जे कर्म करावे ते ते, करील याच अटी ।।१॥
धर्मवर्म मज एकचि कळते, जगणे समुदायी ।
कोणि असो, हव्यास नसावा, धन-माना ठायी ।।२॥
मी म्हणजे मम देश, राष्ट्र मी, कुटुंब महि सारी ।
तुकड्यादास म्हणे हे केले, तरिच खरी थोरी ।।३॥