जिवंत राहण्याकरिता, दुसऱ्या दुःख
(चाल: उठा गड्या ! अरुणोदय झाला..)
जिवंत राहण्याकरिता, दुसऱ्या दुःख सतत द्यावे ।
ध्येय नसे हे माणुसकीचे, समज मनोभावे ॥धृ०॥
जिवंत राहणे ध्येय न असते,कुकर्म करुनीही।
सत् - कृत्यास्तव मरण भूषवी, धन्य जीव होई ॥१॥
समाज उन्नत करण्यासाठी, जगले संत-ऋषी।
आत्मसमर्पण प्रसंग येता, केले धरुनी खुशी ।।२।।
परस्परांचे प्रेम जगावे, यासाठीच जगणे ।
तुकड्यादास म्हणे जे करणे, यासाठिच करणे ।।३॥