ऐकण्यात येउ दे कि, छळतसे कुणी कुणा
(चालः चांदण्यात चालू दे...)
ऐकण्यात येउ दे कि, छळतसे कुणी कुणा l
तसाच धाव सामुरी, साथ द्यावया दिना ।।धृ0।।
भिऊ नको कुणा कधीच, पापियास पाहुनी ।
सत्य जे असेल तेच गर्जु दे ध्वनीतुनी ।।
तोड दीन - बंधना, सुखवुनी गुणी जना ।।१।।
ऊठ ऊठ साधका ! हीच भक्ति भाविका ।
विसरलेत रीत मित्र म्हणुनि खातसे धका ।।
सांग सांग सज्जना, अशीच घ्यावी भावना ।।२॥
विश्व निर्मिले प्रभूनि खेळ खेळू मोकळे ।
मिळुनि सर्व बंधु अम्ही प्रेम वाढवू बळे ।।
तुकड्या म्हणे हेच कळे, तरिच मुक्ति जीवना ।।३॥