घेउनि पूजा विव्हळुनि पाही
(चालः मजवरि माधव रुसला बाई.)
घेउनि पूजा विव्हळुनि पाही ।
प्रभू मंदिरी दिसला नाही ॥धृ०॥
निरंजनीचा प्रकाश केला ।
दृष्टि पाहण्या मनमोहनाला ।
पुष्पांजली वाहण्या तयाला ।
पाहता सावळा चेतन नाही ।।१।।
कुणितरी सांगा म्हणुनी विनविले ।
कोणि न सांगे त्याचि पाउले ।
कोण्या मार्गे लगबग गेले ।
काय करू मज न सुचे काही ।।२॥
वळता मागे सुजन बोलिला ।
प्रभु तर कष्ट कराया गेला ।
विचार त्या चोख्यामेळ्याला ।
तेचि सांगतिल लवलाही ।।३।।
जाता प्रभु मज हर्षुनि बोले ।
ज्यांनी जनहित निर्मळ केले ।
तेचि शेवटी मरजसि मिळाले
तुकड्यादास म्हणे सुखदायी ।।४॥