ऊठ ऊठ सेवका ! साधका !
(चाल: घनश्याम सुंदरा श्रीधरा...)
ऊठ ऊठ सेवका ! साधका ! अरुणोदय झाला ।
ब्राह्ममुहूर्ती उठावयाचा, अजुनि कसा निजला ? ॥धृ0॥
दवबिंदुचे होउनि मोती, लतापत्री दिसती ।
पक्षीगण एक मेळ करुनी, मधुर गान करिती ।
दुग्ध प्यावया वत्स हंबरुनि, गायीना तणती ।
सेवक दूध काढण्यापूर्वी अम्हा पाज म्हणती ।।
निशा आपुले कार्य उरकुनी, माघारा सरली ।
लाल प्रभा दिसतसे, गमत भानुची स्वारी आली ॥१॥
चला करु स्वच्छता दक्षता, घेउनि आश्रमिची ।
स्नान करुनि प्रार्थनास्थलावर,लेंन धरु अमुची ।।
निर्मल होउनि ध्यानाकरिता, रीघ मुमुक्षुंची ।
संतमंडळी मंदिरातुनी, बघत वाट आमुचरी ।।
मधुर ध्वनिने घंटा स्फुरली, निलाद रुणझुणले ।
गुरुदेव प्रार्थना - आसनी, विराजीत झाले ।।
तुकड्यादासा धूपदीपिका, निरांजणी दिसली ।
सकल मंडळी देव-देवता - ध्यानास्तव बसली ।।२॥