कुजेलना हे धन मातीतचि

(चालः अवताराचे कार्य कराया...)
कुजेलना हे धन मातीतचि, शेवटी सोडुनि जाशिलना ।
कोणि न उपभोगी,मग यावर-भुत बनुनि तू राहशिलना ।।धृ०।।
घोरपडीपरी चिपकुनि बसशी, जरा न उपभोगी कणही ।
तसाच मरशिल क्षण येता मग,घारीपरी वरी फिरशिलना ।।१॥
यातुनी चुकशिल कसाबसा तर, आग घरावर जोर करी ।
नाहीतरि डाकूंचा हल्ला, येउनिया  धन   हरशिलना ॥२।।
ज्या रक्तावर धन जमले हे, कोण तुला ठेविल सुखी ?
सोड वासना धनदौलतिची, कसे तरी हे नाशिल  ना ॥३॥
धन हे देण्यानेच उसळते, दान करी धन मान करी ।
देण्याने वैभवास चढशिल, दाता म्हणवुनि घेशिलना ॥४॥
लुटवुनि देऊ नको धना परि सार्थक होईल तसे करी ।
तुकड्यादास म्हणे श्रीमंता ! अमर कीर्ति मग पाहशिलना ।।५।।
            दिल्ली रेल्वे प्रवास, दि. ०७-११-१९५५