रे ! ढोंग का करतोस असा भक्त म्हणोनी ?
(चालः अथ तेरे सिया कोन मेरा, )
रे ! ढोंग का करतोस असा भक्त म्हणोनी ?
हे पोट भरायास मार्ग, नाही का कुणी ? ॥घृ०॥
खातोस जयाचे घरी, तयास फर्सवितो l
खोटीच साक्ष दे म्हणे, मी देव दावितो
कोणास नादि लावि पुत्र देई म्हणोनी ।
हे पोट भरायास मार्ग ।।१।l
मागेच हात घाली, काढि केळी-नारळी ।
घाणीत हात मारुनी सुगंध दरवळी ।
कोणास शिकवितो ही क्षुद्र-बुद्धि मिरवुनि ।
हे पोट भरायास मार्ग ।।२।।
कोणास मंत्र देउनिया द्रव्य नाडिसी ।
हे करुनि चमत्कार जोर दे जुगारिसी ।
घरदार जुगारास लोक लाविती झणी ।
हे पोट भरायास मार्ग ।।३।।
घे सत्य हाती, सांग जना काम कराया ।
चोरी न करा, शुध्द रहा सांगता तया ।
तुकड्या म्हणे तरीच कीर्ति लागते जनी ।
हे पोट भरायास मार्ग ।।४।।
अमृतसर-रेल्वे, दि.०८-११-१९५५