विश्वशांतिचा अमर मार्ग हा संतांनी बोधला

(चालः दयामयी अवतार शांतिका...)
विश्वशांतिचा अमर मार्ग हा संतांनी बोधला ।
ऐकला ? ऐक सांगतो तुला ।।धृ०।।
एक एक व्यक्ति ही शहाणी, उन्नत करुनी अम्ही ।
न राहू देऊ कुणाला कमी ।।
परस्परांनी परस्परांना, अपुलेची समजुनी ।
उणीवा  काढाव्या भरवुनी ।
कुणी न जावे उपभोगास्तव, पुढे पुढे हौसुनी ।
बघावा   समाज  दैनंदिनी ।।
(अंतरा) हा घराघरातुनि अभ्यासची पाहिजे ।
यासाठीच शिक्षण तरुणांना पाहिजे ।
यावाचुनी शिक्षण व्यर्थचि झिडकारिजे ।
समाजसेवा घडते ज्याने,तोचि मार्ग चांगला । ऐकला0 ।।१।।
विद्वत्ता लाभली कुणाला, व्यक्तीसाठी नव्हे ।
तयाने समाज घ्यावा जीवे ।।
उद्योगी अणि कलावान, धनवानही असती कुणी ।
असू नये समाजासि झिटकुनी ।
आप - आपुल्या बुध्दिपरी, सर्वासि कमाई जरी ।
पहावी समाज- रचना परी ॥
(अंतरा) हे बाळकडूची पाजावे व्यक्तिला ।
हा प्रपंच तुझीयासाठी नसे निर्मिला ।
सगळ्यांच्या सहितचि भाग्यवान व्हायला ।
चाल पुढे, घे पाय सामुरी, हटू नको  रे  मुला । ऐकला0।।२।।
देश-विदेशी सेवा देण्या, हातचि सरसावितो ।
धन्य तो मानव अम्हि वर्णितो ॥
सत्य अहिंसाव्रत, निर्भयता,त्याग हृदयि पाळितो ।
तोचि विश्वास मित्र बनवितो ॥
सगळ्या भूती परमेश्वर हा, अनुभव-रस चाखतो ।
जगाचा होईल सन्मित्र तो ।।
(अंतरा) क्रुरता विसरुनी प्रेमभाव अंतरी ।
ही शस्त्राखतरे जो धरी न केव्हा करी ।
सद्विचार हृदयी पोचवी विश्वांतरी ।
तुकड्यादास म्हणे या मार्गे, शांतिझरा गवसला । ऐकला0।।३।l
       - राष्ट्रपतिभवन दिल्ली, दि. 0९-११-१९५५