येतील दिवस का असे ? मी वाट पाहतो

(चालः अब तेरे सिवा कौन मेरा...)
येतील दिवस का असे ? मी वाट पाहतो ।
प्रभुस       अता        मृत्यु       मागतो ।।धृ०।।
कोणी ना कुणा छळोत    दुष्टबुद्धिनी ।
कोणी ना कुणास लुबाडो जनी   वनी ।
सरळ हृदय ज्याचे तो मान मिळवितो ।
तो प्रीय होतसे जगात, सौख्यि नांदतो ।।१।।
भासती असत्य तया सर्व हाकती ।
चोरी लबाडी ना करी जो त्यास मानती ।
जो शुद्ध नम्र राही, या जनास मान्य तो ।
म्हणे कष्ट करु देव स्मरु धन्य धन्य तो ।।२।।
नि:स्वार्थि लोक राज्य करी भारतावरी ।
ज्या दिव्य तेज तोच धर्म कर्म सावरी ।
तुकड्या म्हणे मी त्यास रामराज्य बोलतो ।
नाहीतरीच व्यर्थ  जिणे,   देव    दावतो ॥३॥
- अमृतसर रेल्वे, दि.०८-११-१९५५