गेले दिवस काय आठवावे

(चाल: पैल तो गे काऊ कोकता हे..)
गेले दिवस काय आठवावे ।
नव्याने     जगावे     देवापायी ॥धृ०।।
केल्या कर्मव्याधी, उपाधी सहीत ।
मोजण्याची रीत   नाही    बरी ।।१।।
दंडणे  मुंडणे तिर्थाटन   झाले ।
परी हाती   आले,  ऐसे   नाही ।।२।।
खरे  तेचि धन  संतोषले   मन ।
पाहिले       चरण     देवाचिये ।।३।।
तुकड्याशी आता, विसर न पडो ।
सर्वदा   आवडो, विठू    माझा  ॥४॥