चलाना चलाना बाई ! देव - दर्शनाला

( चाल : विठ्ठल तो आला . . )
चलाना चलाना बाई ! देव - दर्शनाला । 
देव - दर्शनाला बाई ! देव - दर्शनाला ।। धृ० ।। 
गोड गोड गाणी गाऊ , सावळा मुरारी पाहू । 
जरा तरी थांबू तेथे , नेत्र निववुनीया घेऊ ।। 
आपुलालि हृदये खोलू , नाचु हरि संगे डोलू । 
रंगी नाचु श्रीरंगाच्या , वेळ हा   सुमंगल   आला ॥ १ ॥ 
कधी गायि चारित होता , कधी लोणि चोरित होता । 
कधी राधिकेच्या संगे , प्रेमयोग भोगित होता ।।
कधी अर्जुनाला गीता , कर्मयोग बोधित होता । 
आज निराळेची करितो , संदेश हा ऐकू   आला ॥ २ ॥ 
म्हणे पंथ जाती - पाती , एकची करा ह्या सगळ्या । 
भूमिधना वाटूनि टाका , सोडुनिया भेदा काळ्या ।। 
सर्व कामधंदा करुनी , सुखवाया भोळ्या भाळ्या । 
तुकड्या म्हणे ऐकु त्यांचे , मानवता रक्षण्याला ॥ ३ ॥ 
- गुरुकुंज , दि . २६ - ०६ - १९५४