चटकन् जा अन् पटकन् धर त्या सद्गुरुची पाऊले
(चाल: पटातटाला फोइनि आलिस....)
चटकन् जा अन् पटकन् धर त्या सद्गुरुची पाऊले ।
मना! तू ऐक आमुचे भले ॥ध्रु0।l
आजवरी जे बहकत आले, याच मार्गि सुधरले ।
विचारी, तेहि इथे शांतले ।।
(अंतरा) म्हणशील जरी धनिकांची संगति बरी ।
तरि ते का शेवटि रडती गुरुच्या घरी ?
पापोऽहं पापात्मा म्हणती आखरी ।
शांति स्थल या जगी नसे रे ! संतासम चांगले ।
मना ! तू ऐक आमुचे भले ॥१॥
आनंदाचा कंद हरी तो, सद्गुरुयोगे मिळे ।
सफलता जीवनात आकळे ।।
(अंतरा) धावुनि का धसधस जासी विषयांकडे ?
खायास पाहिजे रसनेला रस वडे ।
पण क्षणात फिरसी नाहि म्हणुनि सुख पुढे ।
चंचलपण हे सोड, सोड रे ! तुकड्या सांगे खुले ।
मना ! तू ऐक आमुचे भले ।।२॥