शक्ति नसे सत्संकल्पाची भीक मागतो हरी !
( चाल : पटातटाला फोडूनि ... )
शक्ति नसे सत्संकल्पाची भीक मागतो हरी !
देई मज निर्भयता अंतरी ॥धृ0॥
अनेकदा वाटले जरी मी तुझाच सेवक असे !
तरी तव कार्य न मुळी होतसे ॥
मलाच किर्ती मलाच सत्ता मलाच धन घेऊ दे !
भक्त मी तुझा फक्त म्हणवू दे ॥
अपुल्या इंद्रियापूर्तीसाठी तुला भजे मी सदा I
असा जीव जगजाहीर हा गधा ॥
( अंतरा ) हे रुचेल का तुज ? संशय मज येतसे ।
परि मन नावरते सांग करावे कसे ?
हे कळते दिसते शक्तिच अंतरी नसे ।
कसे घडावे ? सांग माउली ! विचार याचा करी ! देई मज0 ॥१॥
मोह घडिघडी भुरळ पाडितो झुरळ उडावा तसा ।
कुणी ही पाठविली अवदसा ॥
वाचन अथवा संतसमागम धरुनि करी साहसा ।
उडे मन पतंग गगनी जसा ॥
किती वेळ पकडावे मन हे ? लवचिक सुटुनी पळे ।
अहो ! अम्हि नेत्र असुनि आंधळे ॥
( अंतरा ) कधि येते वैराग्याचे भरते उरी ।
ढळढळा अश्रूही येती नयनांतरी ।
थरथरे अंग - प्रत्यंग आत बाहिरी ।
जरा क्षणाचा वेळ न जाता येइच भोगावरी I देइ मज0॥२॥
किती वेळ रे हरी ! करावे पागलपण हे असे ?
लोक हसतात पाहुनी कसे ॥
हसो बिचारे मानु न त्याचे पण फळ तरि येउ दे ।
स्वाद हा जिवभावा सेवु दे ॥
मज वाटे सततचा तुझा आनंद हृदयि राहु दे ।
अमरसुख याच देहि पाहु दे ॥
( अंतरा ) दे शक्ति - बुध्दि - प्रीयता - नम्रता मुला ।
या साठिच तुज हा देह असे अर्पिला ।
धड इकडे ना धड तिकड़े न करी मला ।
तुकड्यादासा निराश न करी दिव्य दृष्टि दे खरी । देइ मज निर्भयता अंतरी ॥३॥