सोड सोड बा भारतवर्षा ! लाड रुढीचा अता

( चाल : हटातटाने पटा रंगवूनि ... )
सोड सोड बा भारतवर्षा ! लाड रुढीचा अता ।
उभा हो घेऊनि कर्तव्यता ॥धृ0॥
राष्ट्रधर्म हा विसरूनि सगळा घेसि लोभ करतळी I
जासि बघ परराष्ट्राला बळी ॥
विसरशील मग देवपूजा ती संध्या  - तिर्थाटने ।
थाटतिल परराष्ट्रे पाहुणे ॥
परधर्माचा जोर पडे मग सत्तेच्या बाजुने ।
हारपे संस्कृतिचे ठेवणे ॥
( अंतरा ) मठ - तीर्थ - मंदिरे धुळीस ही मिसळती ।
स्वार्थ - भोगवादी लाटा जै उसळती I
आपुल्या बळाने असुरजना कुचलती ।
कय वाजवित बसला अपुले जुने तुणतुणे वृथा ?
उभा हो घेऊनि कर्तव्यता ॥१॥
जाति - पंथ संप्रदाय सगळे ठेव कोंडुनी घरी ।
भारतीय म्हणुनि बंधुता धरी I
उणा न ठेव कुणा सुखाने राव - रंक् सम करी ।
उंच निच भाव मुळातुनि हरी ॥
प्रेम न्याय अणि चारीत्र्याने श्रमनिष्ठेने करी I
गाव - गाव हे तीर्थ भूवरी ॥
( अंतरा ) घे स्वावलंबना करी वीरपूजना I
सेवेने सुखवी दीन दुःखिता जना I
समुदाय - भावना बिंबू दे जीवना I
तुकडयादास म्हणे तरि होइल सत्संगे सफलता I
उभा हो घेउनि कर्तव्यता ॥२॥