राष्ट्रसुरक्षा आधि करा मग करा काय ते करा

(चालः धन्य धन्य गे स्फूर्ति तन्मये... )
राष्ट्रसुरक्षा आधि करा मग करा काय ते करा ।
नाहि तरी धोका आहे खरा ॥धृ0॥
चहूबाजुंनी शत्रू जमले घुसले देशामध्ये ।
वेळ हा क्षणभरि ना जावु दे ॥
विद्यार्थ्यांपासुनी तरुण - शिक्षकांसहित व्हा उभे ।
सैन्य हे सजवा सांगा सभे ।
सगळे उद्योगासी लाऊनी कर्तव्ये वाढवा ।
आपुला राष्ट्रधर्म साजवा ll
( अंतरा ) अम्ही भारतवासी सर्व एक होऊनी ।
अणि सर्व पक्ष - पंथांसहि पाचारुनी ।
धनधान्यहि जमवा पडो न काही कमी ।
भेटभाव हा विसरुनि आता स्वातंत्र्या सावरा ।
नाहि तरि धोका आहे खरा ॥१॥
शत्रू घुसण्या आधी घुसतो कलह अशांती जनी I
मानती जरा न कोणा कुणी ।
स्वैर स्वारथी मदांध गुंडे व्यसना प्रोत्साहती ।
धर्म हा पायधुळी रगडती ॥
सत्ताधारी आपसातची वैरभाव पसरवती ।
न राहते देशाची त्या स्मृति ॥
( अंतरा ) हे सर्व चिन्ह प्रगटले स्पष्ट भासते ।
कधि गिधाड कोल्हे बरात मस्तावते ।
शुभ प्रसंग असता अंध :कार पसरते ।
पाहता सगळे विचित्र वाटे याला सुधरा जरा ।
नाहि तरि धोका आहे खरा ॥२॥
धनही नाही जनही नाही मठ मंदिर सर्वही ।
भासते तेजहीन ही मही I
खड्खडाट हा शस्त्रास्त्रांचा ऐकू येतो पहा ।
मित्र हो सावध आता रहा ॥
घराघरातुनि वीरवृत्तिचा झरा येऊ द्या पुढे ।
तोडण्या सर्व शत्रुचे कडे ॥
( अंतरा ) तो दिवस आठवा स्वातंत्र्यापूर्विचा ।
ती गुलामगिरी जणू कळसमानहानिचा ।
भाग्याने आला लाभ करा साहसा ।
चिराय हो स्वातंत्र्य म्हणा यासाठि एकता करा I
नाहि तरि धोका आहे खरा ॥३॥
स्वातंत्र्यासाठीच जाहले शहीद प्राणार्पूनी ।
ध्यान हे स्मरा आठवा मनी ॥
लोकमान्य गांधीजी आदि किती महापुरुष कष्टले ।
सुभाष नि सावरकर ही भले ॥
गेले ते अवतारची ठरले देशाच्या चिंतनी ।
किर्ती ती होउ न द्यावी कमी ॥
( अंतरा ) ही पंधरा ऑगस्टची वेळ सुखवु या ।
या ध्वजास वदन करा नेम टिकवू या ।
यासाठी अपुले निर्भय पद पाहु या I
तुकडयादास म्हणे ऐका ही धर्म संस्कृती धरा I
नाही तर धोका आहे खरा ॥४॥