किती आवरा या मनाला पूर्णता देईना साधनाला
(चाल: ये देखो जला घर किसिका)
किती आवरा या मनाला पूर्णता देईना साधनाला ।
मूर्ति पूजा करी ध्यान घे अंतरी तरी स्थिर ना बसे आसनाला ॥धृ0॥
कुणी भस्म लावोनी अंगा कुणी वाचताती अभंगा ।
कुणी नाचती कुणी हासती या गंगेतिरी देवळाला ॥१॥
कुणी माळ घालोनी कंठी कुणी लाऊनिया लंगोटी ।
कुणी यज्ञा करी योग यागा धरी परि शांती नसे त्या जिवाला ॥२॥
सर्व केले तरी शांति नाही साधना साध्य नाही जराही ।
दास तुकडया म्हणे सद्गुरुच्या विणे पूर्णता येईना ही तयाला ॥३॥
प्रेमकुटी मुंबई दि. २५ - ०९ - १९६३