सत्तेसाठी स्वराज्य नसते आठवते का तुला

(चालः पटातटाला फोडनि आलिस...)
सत्तेसाठी स्वराज्य नसते आठवते का तुला ।
वाच तरि बोध शोध घे मुला ॥धृ0॥
घराघरातुनि उद्योगाचे वाढवु आम्ही झरे ।
स्वदेशा भूषण व्हाया खरे I
सुंदर शेती खता - मुतानी नांगरून साजरी ।
वाढवू धनधान्ये घरोघरी ॥
अम्हीच अमुचे राजे म्हणुनी नीति धर्म आचरु ।
शक्तियुक्तिने देश सावरू ॥
( अंतरा ) या संकल्पाने शहीद झाले किती ।
जन सुखी कराया प्राणाची आहुती ।
ती नको गुलामी भ्रष्ट होतसे मती ।
म्हणून स्वातंत्र्यास्तव जनता टाकि पुढे पाउला ।
सोडुनि सान थोर गलबला ॥१॥
गांधीच्या कई वर्ष अगोदर रचिली गेली धुरा ।
गांधीने यज्ञ करविला पुरा ॥
नशाबंदी गोहत्या बंदी घुसखोरी बंदी ही करु ।
न्याय आम्ही सगळे अपुला करु ॥
शहर असो वा ग्राम सर्वही समान हित दाखवू ।
धर्म सगळ्यांचा दृढ राखवू ॥
(अंतरा) ही जांहिर केली घरा - घरातुनि ध्वनी ।
तरुणास वळविले सत्याग्रह दाउनी I
चेतला जागला देश चहूबाजुनी ।
आज जाहले शत्रु घरातुनि लोभ वाढला खुला I
पक्ष उपपक्ष भेद वाढला ॥२॥
स्वराज्य बाळा जन्मुनि झाले वीस वर्ष ही खरी ।
बाळपण गेले मागे दुरी ॥
आज पाहिजे होता मुलगा समजदार वीर हा ।
धर्म चारित्र्य नीति धीर हा ॥
परंतु सगळा हूडपणा नवरक्त बिघडले दिसे ।
दारुडा चोर गुंड दिसतसे ॥
( अंतरा ) आई - बाप संतथोरास धूळ चारतो ।
काळा बाजार घुसखोरीने मिरवतो ।
कॉलेज मंदिरे दगडाने उधळतो ।
सत्तेसाठी मरतो विसरुनि माणुसकी आपुला ।
असा हा स्वराज्य गुंडा भला ॥३॥
तरूण वयामधि हूडचि असतो गुंडचि असतो जरी ।
रीत ती दुसरी राहते खरी ॥
अमुच्या देशावरी कुणीही हल्ला - हमला करी ।
चढू मग शिस्तीने त्यावरी ॥
अपुल्या देशामध्ये शांतता नांदवु करु एकता ।
तरुणपणि हीच असावी व्यथा ॥
( अंतरा ) सेवेस्तच अपुले रक्त असो आटले ।
मानवता सत्यासाठी लढू चांगले ।
धर्मास्तव मरणे भूषणची आपुले ।
तुकड्यादास म्हणे हे व्हावे तरीच तू शोभला ।
नाहि तरि काळ फुकट घातला  ॥४॥