विश्व माझेच घर म्हणण्या , पाहिजे बुध्दि विश्वाची
( चालः प्रभु ! हा खेळ दुनियेचा . . . )
विश्व माझेच घर म्हणण्या , पाहिजे बुध्दि विश्वाची ॥ धृ० ॥
जगाच्या नाटकामाजी , घटक मीही उभा आहे ।
कराया पूर्णता त्याची, तयारी पाहिजे साची ॥ १ ॥
नटाया दिव्य मानव हा , त्यजावी सांप्रदायिकता ।
नको पक्षांधता कुठली, धर्म वा स्थान, वर्णाची ॥ २ ॥
शासनाची भिती कसली ? जरी मी सर्वची कर्ता ।
वागणे सर्व उन्नत हे, तयारी सर्व त्यागाची ॥ ३ ॥
करावे काम सर्वांनी, रिकामा ना असो कोणी ।
प्रभु हा एक सर्वांचा, म्हणु अम्हि लेकरे त्याची ॥ ४ ॥
समजतिल जे सुबुध्दीने , तया ना मागची चिंता ।
म्हणे तुकड्या सकल जन हे , प्रफुल्लीत भूषणे अमुची ॥ ५ ॥
- वरखेड मार्ग , दि . ०१ - ०४ - १९५५