सुंदर या मधुवनी - फुलांची, शोभा अति फुलली
( चालः वाजवी पावा गोविंद . . )
सुंदर या मधुवनी - फुलांची, शोभा अति फुलली ।
बहरली वेली हिरवळली , भावना प्रसन्न मनि झाली ।। धृ ।।
आसन दगडाचे धराया ध्यान श्रीगुरु ! तुमचे ।
उताविळ वत्ति स्थळि स्थिरली ll भावना० ॥ १ ॥
पक्षी किलबिलती , नाद मनि मधुर स्वरे भरती ।
नाचती हवेत अलबेली ।। भावना ॥ २ ॥
वायु मधुर वाहे , जणू हा मंजुळ गुण गाये ।
अरुण वरी प्रकाशवी लाली ॥ भावना० ॥ ३ ॥
ध्यान धरु वाटे , वेळ हा तन्मयपणि कंठे ।
म्हणे तुकड्या स्फूर्ति स्फुरली ॥ भावना० ॥ ४ ॥
- कारंजा - मार्ग , दि . ०२ - ०४ - १९५५