आत्मज्ञानाविना तुज मोक्ष तो कैचा ?

(चाल-ओवाळा ओवाळा माझ्या....)
आत्मज्ञानाविना तुज मोक्ष तो कैचा ?
उल्लंघी चार   वाचा   लावी   उन्मनी   ठसा ॥धृ०।।
का भ्रमसी प्राण्या! लक्ष चौ-यांशी फिराया ? ।
न मिळे ठाव अजुनी, जाईल नरदेह वाया ।।
न ये मग यमासी तुझी बा ! काही दया ।
अवतरले   सदगुरु    भार   घ्याया    जगाचा ॥१॥
आधी देख मूळस्थानी दैवत गणपती ।
अठराशे जप होतो, वसे सरस्वती सती ।
चार शिव लिंगे फिरे घेऊनी भवती ।
पाहि पाहि त्वरित गा । आरक्त  वर्ण   त्याचा ॥२॥
चालतसे घटि माळ, नाव तिचे निरंजन ।
सहस्त्र दळावरी गुदस्थानापासून ।।
मध्ये राहे प्राण- व्यान - उदान - समान ।
बावन्न मातृका,  तेथे    जप    दो    अक्षरांचा ॥३॥
सद्गुरुवाचुनिया सिद्धी न मिळे तुला ।
कितीहि ग्रंथ वाचा, जरी योगाभ्यास केला ।।
जगाचे कल्याणार्थ आडकोजी अवतरला ।
तुकड्यादास म्हणे आता अजपी राही साचा ।।४॥