ठेवी लक्ष ब्रह्मानंदी अजुनी

(चाल माण्या रामाला आणा....)
ठेवी लक्ष ब्रह्मानंदी अजुनी । मौज चाले ती स्वरूपगगनी ॥धृ०॥
सप्त सागरी वाहतसे पाणी । रत्न सातावरी राही ज्ञानी ।।
चौथे शून्य धरूनि जाय कोणी । चारी वाचा वरी उन्मनी ॥
जिथे   पाही     तिथे     रामवाणी ॥१॥
करुनि उलट-पट क्षण राही । मग दसवे खिड़की रत्न पाही ।।
पश्चिमेसी मार्ग जातो तोही । श्रीसद्गुरुविणा खण नाही ।।
मायाच्छेद       करी   तो    प्राणी ।।२॥
वाद्ये वाजती विलक्षण सुंदर । महाली आसन एकविसावर ॥
खेळे बाळ अंगुष्टी अधर । रविचंद्र अजब चमकदार ।।
मौन   झाले   वेद - शास्त्र   दोन्ही ॥३॥
तुकड्यादास शरण साष्टांगे । आडकोजी-चरणी जा रे ! वेगे ॥
स्व-उद्धार होईल संत   संगे । आत्मरंगी जव ही वृत्ती रंगे ॥
पाहो जाता नुरे सत्यासत्य कोणी ॥४॥