स्वातंत्र्याचा विजय असो , या भारतभूमी वरी

( चालः पटांतटाला फोडुनि आलिस . . ) 
स्वातंत्र्याचा विजय असो , या भारतभूमी वरी । 
मित्र हो अन्य राष्ट्रही तरी ।। धृ० ॥ 
विश्व सुखाचा घटक आपुला , देश धन्य म्हणविला । 
याच दिनि भारत - ध्वज फडकला ।। 
स्वातंत्र्याची विजयदेवता , पुज्य गांधी आपुला । 
अहिंसेनेच विजय लाभला ।। 
( अंतरा ) मानवी हक्क सकळास मिळो  तो म्हणे । येरव्ही न स्वातंत्र्यास तिळभरी गणे । 
आराम न जनते तरी व्यर्थ ते जिणे ।
हेच समजुनि लढला न्याये , केली तपस्या पुरी । 
फडकला राष्ट्रध्वज अंबरी ।। १ ।। 
त्याच मार्गि आदर्श देश हा , पुढे पुढे आपुला । 
आजवरि हेच करु लागला ॥ 
महान संकट पार करोनी , सफल होउ लागला ।
करोडो जीव जगवुनी भला ।। 
संतमहंतानीच पूर्वि हा , गौरवुनी सोडला । 
त्याच मार्गावरि सरसावला ॥ 
( अंतरा ) ही मानवतेची ज्योत जागती असो । 
पाशवी शक्तिचा लेश न अंतरि घुसो । 
प्रेमाने समता - ममता , विलसो - दिसो । 
घराघरातुनि तरुण वीर हा , उत्पादन घे करी । 
सुगंधी ही जणु सोन्यापरी ॥ २ ॥ 
महामंत्र हा मानवतेचा , कथी विनोबा जना । 
लावुनी प्राण आपुले पणा ।। 
भूमिदान , धनदान आणि श्रमदान करीती किती । 
बहरली भारतमाता - प्रिती ॥ 
चहु बाजूंनी जागृत झाले , जन हे ध्वनि फेकती । 
बाँट दो श्रम , धरती , संपत्ती  ॥ 
( अंतरा ) या जागृतिने लोभी न राहती पुढे । 
जे करितील आळस जिव त्यांचा गडबडे । 
ही दैवि शक्तीची लाट उठे चहुकडे । 
समान होतिल रावरंक  हे , दिसती जणुं अंतरी । 
तरुण हे उरु न देती उरी ॥ ३ ॥ 
लोभि - लबाडासाठी न आता , देश राहतो खुला  । 
असा आवाज होउ लागला ।। 
धरा धरा रे ! शराबवाले , गुंड - बंड गाविचे । 
नसावे दुर्गुणची कोणचे ।। 
जिकडे तिकडे शिक्षण देउनि , भाग्य उठवु भूमिचे । 
न सहो दलालची कोणचे ।। 
( अंतरा ) प्रत्येक गाव हे स्वतंत्र आता करु । 
अपुल्याच श्रमाने उत्पादन सावरु ।। 
न्यायनीति सगळी अपुल्या गावी भरु । 
तुकड्यादास म्हणे उणिवेची , रीघ भरे बावरी ।। 
खुशी ही होवो , संकलांतरी ॥ ४ ॥ 
       - कलकत्ता - रेल्वे , दि . २४ - १२ - १९५४