राष्ट्रधर्म पाया विश्वाचा , समज येवु दे तुला

( चाल - हरिभजनाची रूच्या जयाच्या . . . ) 
राष्ट्रधर्म पाया विश्वाचा , समज येवु दे तुला । 
सुधर ये ! असशिल जरि विसरला ! ! | | धृ० ।। 
राष्ट्रासाठिच उभे सर्वहि देव - देवता दिसे । 
दुसरे कारण त्यांना नसे ॥ 
बघना जावुनि जरा मंदिरी , धनुष्य घेऊनि कसा । 
उभा तो रामचंद्र सतत सा ।। 
लक्षुमणा सहितहि वीर , हनुमंत गदा घेउनि । 
उभे जणु सतर्क अपुल्या मनी ।। 
त्यागमूर्ति शिव - शंकर सजला नाग - त्रिशुल हे करी । 
स्वारि जणु शत्रूवरी . . . ॥ 
( अंतरा ) ते चक्र - सुदर्शन घेउनि धावे रणी । 
तोचि ना पाहि भगवान कृष्ण लक्षुनी । 
रथ चक्र पुरेना , तया फेकि तडपुनी । 
तू कसला रे ! बनुनि नेभळा पाहतो भांबावला ।। 
सुधर ये ! असशिल जरि विसरला ! ! ॥ १ ॥ 
ही बघ दिसते व्याघ्रावरती आदिशक्ति माऊली । 
घेऊनी कट्यार उभी जाहली ।। 
मुंडमाळ घालुनी गळ्यामधि रक्ताने व्यापली । 
मारण्या दुष्टा सरसावली । ।
हा बघना नरवीर शिवाजी , छत्रपती चमकला । 
देवीचा सुपुत्र जणु गाजला । । 
( अंतरा ) अरे ! कश्यासाठि ही उग्र तपस्या तरी । 
महाराणा फिरला कोणास्तव भूवरी । 
हा परशुराम - बलराम पाहिना तरी । 
देशासाठिच ना हे लढले ? सुखी कराया तुला । 
सुधर ये ! असशिल जरि विसरला ! ! ॥ २ ॥ 
स्वातंत्र्यावर गदा आलि तर , जगणे कसले तुझे ? 
अग्नि जणु सगळा घेउनि विझे । 
कोणि पुसेना तुला म्हणोनी सावध होई कसे । 
बघुनि घे दाहि - दिशे साहसे । ।
सर्व त - हेने सज्ज राहुनी उभा तरी हो नरा ।
तरिच तू शोभशील भूवरा । । 
( अंतरा ) नच मारि कुणाला परि न मृत्यु हो तुझा । 
लागु दे तिडक ही गेल्याचि काळजा । 
करि जागृत ही मानवता आणि पुजा । 
मेळ घालुनी जगशील तरि तू म्हणुनि बोल हा दिला । 
सुधर ये ! असशिल जरि विसरला ! ! | | ३ | |
बलवानासी पराक्रमाने लढण्याने मित्रता । 
होतसे शिक्षण घे हे अता । । 
शांति तुझी तर शांति आमुची , नम्र तुझ्याहुनि अम्ही । 
अशी धर्माची अमुच्या हमी । । 
चढशील जरि तू हिमालयावर जरा सहन होईना । 
पाय बघ पुढे जरा घे पुन्हा । । 
( अंतरा ) त्या पुण्यशिलाचे तत्त्व तयाचे करी । 
तो गेला करुनी शांति जगाच्यावरी । 
परि परिवर्तनशिल असे वृत्ति बावरी । 
तुकड्यादास म्हणे अम्हि तसले नाहित रे समजला । 
सुधर ये असशिल जरि विसरला  ! !  | | ४ | | 
          - श्रीगुरुदेव मासिक मार्च १९६०