स्वार्थ - प्रतिष्ठेच्या माकोड्या ! तोंड तरी आवरी
( चाल : पटा - तटाला फोडुनी आलीस . . )
स्वार्थ - प्रतिष्ठेच्या माकोड्या ! तोंड तरी आवरी ।
वाजली घंटा भारत - भरी ॥ धृ० ॥
दिसतची नाही काय तुला तू तुटशिल मानेतुनी ।
ओढतिल क्रांति - दूत मागुनी । ।
वेळ संपली , पोटहि तनले , दुर्गंधी पसरली ।
हसी अणि मजाक सुरु जाहली । ।
( अंतरा ) रे ! पाहा तरी जनतेत मान वळवुनी ।
तुज काय वानती लोक घराआतुनी ।
ठेवशील कोणी तरी साह्य म्हणवुनी ।
अम्ही तसे अणि तुम्ही तसेची जोड सजविली बरी ।
वाजली घंटा भारत - भरी ।। १ ।।
पहिली घाटहि संपत आली , दुसरी बघ वाजते ।
ऐकतरी जनमत ते बोलते ।।
पिसाळल्यापरि करितची जातो काही म्हणो जरी कुणी ।
वाकुली तूंच दाविशी झणी ।।
पूर्णशक्ति बघ तुला धराया , आली चहुबाजुनी ।
वाजते भेरी गगनातुनी ।।
( अंतरा ) दे सोडुनी स्वार्थांधता सरळ हो गड्या !
मजुरांसम करी गुजरान विसरुनी उड्या ।
करी जनमत सगळे अपुले धर साखळ्या ।
हीन - दीन जे अजुनिहि फिरती , कार्य तयाचे करी ।
वाजली घंटा भारत - भरी ॥ २ ॥
स्वातंत्र्यास्तव जसा कष्टला , त्याहुनीहि हो पुढे ।
वाजतिल तरिच तझे चौघडे ।
जन - जागृत करुनिया शांतिचे प्रभाव दे रोकडे ।
करी सेवेत तरुण हे खडे ।।
( अंतरा ) मन जाउ नको देऊच विषयांच्या दिशे ।
आवरि हे अपुले नाच - तमासे - पिसे ।
हो सावध भारत गौरवण्या साहसे ।
लाज राख अपुल्या शहिदांची , मेले जे भूवरी ।
वाजली घंटा भारत - भरी ।। ३ ।।
लुचपतखोरी , चोरी - चहाडी , व्यभीचार अणि निशा ।
झाडुनी काढ अता अवदशा । ।
अधिकाराची उगिच लालसा , धरू नको रे मनी ।
तपस्या करी दुःख साहनी ।।
( अंतरा ) हो अंतर्मुख घे रुजू आपुल्या मना ।
आत्म्यास पूस - मी पापी की शाहणा ।
तो साक्ष देई मग वाग तसा सद्गुणा ।
तुकड्यादास म्हणे नाहीतर घेशि गुलामी उरी ।
वाजली घंटा भारत - भरी ॥ ४ ॥
- नागपूर , दि . १९ - ०१ - १९५९