हासत हासत आलि दिवाळी
( चाल : फटका . . . )
हासत हासत आलि दिवाळी , दिवाच विझला किति घरचा ।
कसला मग उल्हास जीवाला , सण झाला वरचा वरचा ।।धृ॥
मनात आहे दिवे उजळणे , कुठे करावे उंबरठे ।
घर गेले अणि छप्पर गेले , मोडमाड झाले घरटे ।।
धन - धान्य ही वाहुनि गेले , अन्नाचा कन नाही घरी ।
लाडु - करंजी काय करावी , भाकरीही ना मिळे पुरी ।।
जिकडे - तिकडे दुःख पसरले , तोल सावरावा कसचा ।
कसला मग उल्हास जीवाला , सण झाला वरचा वरचा ॥१॥
घर जावो पण जीवहि गेले , गेली गाई - गुरे तसली ।
कुठली गौळण नाचणार रे , हौस कुणाला ही असली ।।
बारुद उडवा कोण शहाणा , म्हणेल संकट ओढवता ?
ज्यांना माणुसकी ना उरली , असाच बोले कोणि अता ।।
परस्परांचे दुःख पाहनी , गळा न दाटे कोणाचा ।
कसला मग उल्हास जीवाला , सण झाला वरचा वरचा ।।२।।
जरीकाठी कपडे अणि सोने , दागदागिने का घाला ?
आज तयावर पाळी तसली , न कळे येईल आम्हाला ।।
म्हणुनि सगळे एकमताने , दिवाळिला सांगू रुसुनी ।
साथी अमुचे दुःखि म्हणूनी , दिवाळी न करु आम्हि कुणी ।।
पुढचे दिवस सुखाचे यावे , तरीच सण हा दिवाळीचा ।
कसला मग उल्हास जीवाला , सण झाला वरचा वरचा ।।३।।
उरला सुरला पैसा जमवू , त्या लोकांना साह्य करु ।
ज्यांचे जीवन नष्ट जाहले , अन्न - वस्त्र त्यांना पुरवू ।।
घरोघरी त्या हीन - दिनाला , जेवण देण्या मान करु ।
तुम्ही आमुचे बंधु म्हणुनी , अति हर्षाने साह्य करु ।।
कुठले हरिजन कुठले ब्राह्मण , सगळा भारतची आमुचा ।
कसला मग उल्हास जीवाला , सण झाला वरचा वरचा ।। ४।। या वर्षाची हीच दिवाळी , कळकळिची ही हाक असे ।
संकटकाळी या वाचुनिया , दुसरा कोणी धर्म नसे ।।
जे जे गेले त्या सगळ्यांना , अमुची श्रद्धांजली असे ।
अष्टग्रहांचा भाग म्हणुनी , अजुनी मन हे शांत नसे ।।
तुकड्यादास म्हणे मज वाटे , अंत न पाहो प्रभु अमुचा ।
कसला मग उल्हास जीवाला , सण झाला वरचा वरचा ।।५।।
- सौंसर ०९ - ०९ - १९६१