जगत्चालका ! जगनिर्मात्या तू आधारचि जगताचा
(चालः उठा गडा अरुणोदय झाला...)
जगत्चालका ! जगनिर्मात्या तू आधारचि जगताचा ।
संरक्षण करण्यास दिले ज्या तपास कर तरि ये त्याचा ॥ धृ0॥
तुझ्या नादि जी जनता होती दैवि शक्ती ही म्हणुनिया ।
झाला हास पुरा सगळ्यांचा धर्मचि गेला रे वाया ॥१॥
असुर वर्तनी जनता झाली मास - मदिरादिक खाती ।
चोरी जारी गुंडपणाने गरिबांना छळतात अती ॥२॥
केविलवाणी गति सर्वांची निर्भय कुणी पुढे ये ना ।
पोटापाण्याच्या चिंतेने भितीच रे ज्यांना त्यांना ॥३॥
वरिष्ठ सगळे चढी - बढीस्तव मानवता ही सोडोनी ।
स्वार्थासाठी पाप कराया जरा न लपती बघ कोणी ॥४॥
सत्तेसाठी भावुक गर्दी महापूर हा जणू आला ।
अपुला परका ओळख नुरली आदर नाहि कुणा कुठला ॥५॥
भर दिवसाही खून दरोडे करुनीही कुणि सुटताती ।
सजन भोळे गरिब शेतकरि यांची फजीती अनगिनती ॥६॥
कधि येशील पाहण्यास अशा या अंदाधुंद तमाशाला I
तुकडयादास म्हणे आम्हि अपुले सुधरू भरवसा हा नुरला ॥७॥