कधि येईल हो ? गरिबजनांचा काळ !

(चालः बारबार तोहे क्या समझाये ?...)
कधि येईल हो ? कधि येईल हो ? गरिबजनांचा काळ !
आजवरी दुर्देवाने दाखविला आम्हासी टाळ ! !
शिक्षण नाही धर्म हि नाही वाळीत पडले बाळ !
करु काही मार्ग म्हणुनि बोलण्याचा होतो सुकाळ ॥धृ0॥
कष्ट करावे मुले शिकवावे गरज वाढली फार !
पोट भरोनी जरा न राहे ना कवडी जमणार ! !
हौस आजची अजब वाढली दिसतो सर्व सुकाळ ! 
सांग तरी कोणा सांगू ? आपुलेची थोटे कपाळ ! !
कधि येईल हो ? कधि येईल हो ? 0 ॥१॥
जरा धर्म सोडुनिया जावे मन ना घेते पाय !
आजवरीची चिंता करुनि न मिळे काहि उपाय ! !
कोणाची संगती करावी बसेल अमुचा ताळ !
सांगा - सांगा जन लोकांनो ! जपावी कुणाची माळ ? ?
कधि येईल हो ? कधि येईल हो ? 0 ॥२॥
सर्व मिळोनी काहि करावे नसे एकता आज !
सवंचि गाति अपुले - अपुले तुटेना असा रिवाज ! !
म्हणूनिच पिकली काहि जनांची जातियतेची डाळ !
म्हणे दास तुकड्या देवा ! - सुमार्गाचि, तोडीना माळ ?
कधि येइल हो ? कधि येइल हो ? 0 ॥३॥