जन्म-मरण दुःखे येता-जाता भोगावी
जन्म मरण दुःखे येता जाता भोगावी ।
आमुचिये भाळी काय आखिले देवे ? ॥
येऊनिया जन्मा पुण्य पडेना गाठी ।
पाप उठाउठी बळे धाव घे मागे ॥
अविद्येचा जोर मन ओढाळी धावे ।
केले दुःखी भवे सुख देखे ना डोळा ॥
पाहता पाहता झाली काळाची दाटी ।
जीवाचिये पाठी कधी सुख ना लाहे ॥
असो नसो सुख मज ठाव दे पायी ।
सदा नामी राही ऐसा भाव दे देवा ! ॥
तुकड्यादास म्हणे प्रारब्धाने मागावे ।
असे जरी ठावे तरी नाम ना सोडू ॥