वीर सेवका ! ऊठ ऊठना क्रांति
( चाल : उठा गडया अरूणोदय झाला ... )
वीर सेवका ! ऊठ ऊठना क्रांति - तुतारी ऐक जरा I
समतेसाठी युद्ध शांतिने सुरू झाले रे घरा घरा ॥धृ0॥
जनास समजुनि द्यावयास - एक फकीर पायी पायी फिरे I
भूमिदान धनदान करा ! हा मंजुळध्वनि कानात भरे ॥१॥
अलोट गर्दी तया बघाया मार्ग मिळेना चलण्याला ।
चहुंबाजूंनी रान पेटले भूमि द्या ! म्हणती त्याला ॥२॥
कसेल त्याची भूमि खरी ही हक्काने त्याने घ्यावी ।
उपज करावी राष्ट्रासाठी ज्वारी - बाजरी पिकवावी ॥३॥
तुकड्यादास म्हणे या कार्या सर्व मिळोनी सफल करा ।
वेळ न गमवा चला धावुनी भूमिदानाची धरा धुरा ॥४॥
- मुंबई दि. २८-०७-१९५३