जमिनदारांनो ! हाक जरा ऐका
( चाल : चोरी करायला कशाला ? ... )
जमिनदारांनो ! हाक जरा ऐका जामिनदारांनो ! ॥ धृ0॥
झाले सुरू भूमिदान कानी ऐका निदान ।
सोडा स्वार्थाचे भान ।
मनि ठेवू नका काहि शंका ॥१॥
सारे रडती मजूर कष्ट करुनी भरपूर ।
नाही देहास नूर !
याने होईल देशाची लंका ! ॥२॥
जे जमीन कसतात राबतात शेतात
त्यांच्या जमीन हातात-
देऊन टाळा हा होणारा धोका ॥३॥
देऊन जमिनीचे दान वाचवा देशाचा प्राण ।
थांबवा पुढचे तूफान ।
करा समान रावा नि रंका ॥४॥
ऐका तुकड्याची हाक ठेवा देवाचा धाक ।
सांगा सर्व लोकात ।
वाजला सर्वत्र क्रांतीचा डंका ॥५॥
- पंढरपुर दि. २१-०७-१९५३