कराहो सफल भूमिदान चेतवा
( चाल : सबसे मीठा बोल ... )
कराहो सफल भूमिदान चेतवा हे शांतीचे रान ॥धृ0॥
भूमि असे ही शेतकऱ्यांची कसेल अणि राबेल तयांची ।
असे असुनहि मजूर फिरती कष्टुनि रानोरान। कराहो ॥१॥
कष्ट करावे तरिच जगावे सांगति नेते - संत प्रभावे ।
मग का मिळतो ऐसे असता - लुचपत खोरा मान । कराहो Il२॥
उद्योगी - जन उपाशी मरती चुगलखोर बहु मजा मारती ।
पूर्वजांचि घेऊन कमाई - दाविति उसनी शान । कराहो ॥३॥
भूमिदान हे सफल बनविता मिळेल कष्टीकांना सत्ता ।
तुकड्यादास म्हणे लोकांनो ! द्या समतेला मान । कराहो ॥४॥
-पंढरपुर दि. २२-०७-१९५३