लावा वेड मज देवा ! नाम रूपाचे
लावा वेड मज देवा ! नाम रूपाचे ।
मना लागो पिसे तुझे रूप पहाया ॥
नको देऊ मान अभिमान देहाचा ।
तुझा छंद साचा सख्या लागो विठोबा ! ॥
नलगे ज्ञान विद्या सर्व कला औदशी ।
राहू दे उदासी सदा सर्वदा अंगी ।
नको द्रव्य राजपाट थाटाची थोरी ।
मुखी राहो हरी हाचि द्यावा प्रसाद ॥
तुकड्यादास म्हणे मज न राहो भान ।
कराया भजन शुद्ध प्रेमा लोटवी ॥