घाला नेत्रांजन फिरवा प्रेमाची दृष्टी

घाला नेत्रांजन फिरवा प्रेमाची दृष्टि ।
बहू  झालो कष्टी जन्म मरणाच्या पायी ॥
करा सोडवण या हो देवाधिदेवा ! ।
लावुनिया दिवा नष्ट करा अज्ञाना ॥
काम क्रोध मद यांनी ग्रासलो भारी ।
त्रास देती अरि विषय जहर पाजुनी ॥
क्षणोक्षणी उठे अहंकार - धुंदारा ।
करितो माघारा गाता नामासी तुझ्या ।
त्रैतापांच्या लाटा मना खाती अवसरी ।
नाही तिळभरी सुख पाहिले तुझे ॥
तुकड्यादास म्हणे माया ओढा आपुली ।
मज द्यावी भली सदा सद्गुरु सेवा ॥