सद्गुरु माय बापा !
श्रीगुरु-प्रार्थना
(चाल- गुरुनाथ निरंजन हो...)
सद्गुरु माय बापा ! कशी करु तुझी सेवा ? ।
बहुजन्म विसरलो मी, नच मार्ग मला ठावा ॥
अवचित मानवाचा हा जन्म दिला देवा ! ।
रक्षुनी बालकासी सत् - संग सदा द्यावा ॥१॥
तुजविणा व्यर्थ सारे कर्म धर्म जरि केले।
तापसी जपी योगी तुजपाशी स्थिर झाले ।।
तव चरणामृत घेता स्वस्वरू पेसी धाले ।
करि क्रुपा देव-देवा ! मन तुझ्या नामी जडले ॥२॥
ना कळे कळायाचे, हे ज्ञान उगे वाया।
कळुनिया काय झाले ? जरि नावरली माया ॥
ते गुह्य तुझ्यापाशी मार्गास दाखवाया ।
मी उगाच अभिमानी भ्रमतसे श्रमवि काया ॥३॥
सांग बा ! सांग काही, वाहतो कर्म - धारी ।
मज नसे अधारासी कुणी नाव रोकणारी ॥
तुकड्यादास ठाव देई, हा पाश सर्व वारी
बसवी बा ! नेऊनिया ना येई माघारी ॥ ४॥