तारी तारी सद्गुरु माते !

      (चाल- बाबा अहंकार निशिदिनि)
तारी तारी सद्गुरु माते ! तारीवो ।
प्राण जातो बुडालो भवधारी वो ॥धृ०॥
मार्गा आड लागली भव नदी।
मत्स्य मगरांचे भय तयामधी॥
पाच सहा झोंबती ऐसी संधी।
लक्षचौर्यांशी डोह महाफंदी वो॥१॥
डोही भीति लागते नावाड्यासी ।
मधी भोंवरा संकल्पी अकर्मासी ॥
तेणे जीव पावला दुःखराशी ।
नाव घालिता ओढिती नावाड्यासी ॥२॥
नदी पाट जवळ दूर दोन्ही ।
एके बाजू प्रवृत्ति हे खदानी ॥
दुजी वेष्टिली निवृत्ति हे निशाणी।
मधी बोले तो होय भ्रमी प्राणी वो।| ३॥
निवृत्ति ही निवृत्त झाली ज्याची।
भावनाही खुंटली संसाराची।।
सुख दुःख सारखे दोन पंची।
तोचि जाई न पाड   इतराची   वो  ll४।।
नाव देई वैराग्य - बांधियाची ।
जेथे न चालेल कामना काळाची ॥
खाली निवृत्ति धार पोलादाची ।
वरी कृपा  - अंबर आत साक्षी वो ॥५॥
भावाभाव जाणुनी अंतरीचा ।
माय! शीतळ ओढ ये प्रेमाचा ॥
तरि भवी या होईन पार साचा ।
दास तुकड्या आसरा स्वामियाचा वो ॥६॥