झाली सुवासिन यश ल्याली कपाळी

झाली सुवासीण यश ल्याली कपाळी ।
वाजविली टाळी सद्गुरुच्या   पादुकी ॥
आता मज कोण म्हणे सांगा वांझोटी ? ।
पुत्र केला पाठी रांगावया विवेक ॥
घातले श्रृंगार कंठी पोत नामाची ॥
बांधियेली काची निश्चयाची वो माय! ॥
कुंकुमाची रेषा श्वास भरला भांगोळी ।
पुरवावया आळी मी-तू जीव-भावाची ॥
झाली मी संसारों वर झाला शिवाजी ।
फेडावया गरजी जन्म-मरण फेराच्या ॥
तुकड्यादास म्हणे तुम्ही या हो साजणी ! ।
लावा लावा ठुणी भक्तिचिये मंडपा ॥