झालो मी रिकामा
झालो मी रिकामा काम नेला रामाने ।ळ
काया वाचा मने भक्ति करू निष्कामी ॥
राहो किंवा जावो देह अथवा संसार ।
परि त्याचा विसर न घडो माझियाने ।॥
आले ते खावोनी पोसावे हे शरीर ।
धरूनिया धीर नारायण नामाने ॥
जन्माचा उल्हास नाही मृत्यूची भीति ।
न वाटे ही खंती गणगोत मित्रांची ॥
तुकड्यादास म्हणे काम रामरूप झाला ।
देह हा वाहिला विठ्ठलाच्या पादुकी ॥