सखा मायबाप पांडुरंग जिव्हाळा

सखा मायबाप पांडुरंग जिव्हाळा ।
चैतन्याचा पुतळा पाह या हो साजणी ! ॥
सोडा योग याग लागा याचिया छंदी।
सदा पाय वंदी तोचि होई आनंदी ॥
नेत्री पहा रूप मुखी नाम गा त्याचे ।
अनंत जन्माचे शीण जाती वो माये!॥
आमुचा आमुचा म्हणुनी नाचा सामोरी ।
सोडूनिया लाज ध्यानी ठेवा तो हरी ॥
महा काळाचेही काळ जाती पळोनी।
आठविता मनी रूप पांडुरंगाचे ॥
तुकड्यादास म्हणे सर्वां आहे अधिकार ।
यारे लहान थोर हेवा करू नामाचा ॥