रंगवा रंगवा आधी मन रंगवा

रंगवा रंगवा आधी मना रंगवा ।
लावोनिया दिवा खेळ खेळा उजेडी॥
सोडा अहंकार याने बुडाले घर ।
व्यर्थ बडिवार नका मागे लावू या ॥
द्रव्यासाठी सोंग कासयासी करावे ?।
द्रव्य मागे धावे मन रामी   रंगता  ॥
नाशिवंत देह, काय भरवसा त्याचा ? ।
वेळ हा आजिचा साधा आपुल्या भावे ॥
सोडा लाज लज्जा अभिमानाची थोरी
मुखे हरी हरी ऐसे सुख घ्या डोळा॥
तुकड्यादास म्हणे ठायी आळवा तया।
मने वाचा काया सेवा करा सद्भावे ॥