जाऊ चला पाहू आपुलिया मंदिरी
जाऊ चला पाहू आपुलिया मंदिरी ।
माझा सखा हरी वाट पाहे वेळिये ॥
परेचिये परी वास राहतो त्याचा ।
सुदिन भाग्याचा कधी पावे बाईये ! ।
जागवणी मज कधी भान न राहे ।
म्हणोनिया माये ! काळजी ये तयाची ॥
जिवाचा जिव्हाळा आम्हा तोचि तो एक ।
वाढावया भीक दुजा कोणी ना बाई ! ॥
नासरे हे गोत चालतिचे सोयरे ।
तयावीण येरे सर्व मेले राहती ॥
तयाच्या प्रकाशे सर्व प्रकाशे घर ।
सदा येरझार आत बाहेरी त्याची ॥
तो माझा मी त्याची ऐसा भाव आमुचा ॥
जन्मोजन्मी त्याचा संग न सुटे बाई ! ।
जागृतिये स्वप्न सुषुप्तिचे माझारी।
अंतरतो दुरी कधी भेट फावेना ॥
तुकड्यादास म्हणे एका तुर्ये फावला ।
आमुचा गलबला विरळा जाणे याई वो ! ।।