ऐसिया काननी माये !

ऐसिया काननी माये! मी गेलो आलो ।
जीवे शिवी धालो मूळ-ऐक्य पाहता ।।
ना कोणी बोलता बोलणिया देखिला ॥
एकाएकी भला झाला मेळ मेळणी ॥
ना कोणी ऐकता, ऐक्यपणा मुराला ।
आपेआपी भला खेळू लागे आनंदे।।
ना कोणी देखता देखणिया वाचोनि ।
तोचि तो काननी सुख भोगी ते ठायी ॥
आलिया गेलिया मज न राहे भान।
हे तो दिले ज्ञान गुरु - मार्ग - दात्याने ॥
तुकड्यादास म्हणे वाट वाटाडी झाली ।
जाता येता भली खेळ दावी देखता ।।