गुरु संत आडकोजी स्मरा जीव भावे l
चला उठारे भाई ! हाक देता ती बाबा । उदया येई भास्कर झाली आरक्त प्रभा ॥ गाणीं गात कोकिळा जैसी स्वर्गीची रंभा ॥ पुष्पे झाली मोकळी , आली सुंदर शोभा ॥ १ ॥ गुरु संत आडकोजी स्मरा जीव भावे l संत -नाम गाता लाभ मंगल पावे ॥ धृ ॥ जागलेति पल्लव वृक्ष बेलादी सर्व ।
भ्रमर उठले सारे पुष्पी करि गुंजारव ॥
झुळझुळ मंद वारा वाहे दावितो भाव ।
गोठी हंबरती गायी वत्स पाजाया सर्व ॥ २ ॥ गुरु०||
गुरु शिष्य होती जागे स्नान-संध्या साधाया।
तपी जपासाठी गेले वनी ब्राह्ममुहूर्ती या ॥
कुणी वेदपाठ करिती संथा घेती गुरुचीया।
भक्त ते जाग देती व्दारी अलख गर्जुनीया ॥ ३ ॥ गुरु०॥|
दिवस गेलिया झोपी आळस मोह घेरतील ।
अज्ञान-मुर्कुटे ही अंगा फार चावतील ॥
तेणे विषयाची जोडी नाना लोक पावतील I
तुकड्या म्हणे ऐका अंती यमा हाती जाल ।। ४ ॥ गुरु०॥