जय जय बोला माझ्या सद्गुरुच्या नावाची I
सर्व सुखाचा सार माझा सद्गुरुराव।
भ्रमता भवसागरी पार लावील नाव ॥
अज्ञानाचेसाठी तोचि दावी उपाव ।
अंत त्या संताचा नेणति ब्रह्मादि देव ॥ १ ॥
जय जय बोला माझ्या सद्गुरुच्या नावाची
तुटतील माया-बंध, जोड पावे मोक्षाची ॥ धृ०॥
भक्ती - बीज पेरायासी तोचि बागवान ।
खते भूमि पाहोनीया पेरी तो ज्ञान।।
वैराग्याची काटी लावी व्हाया रक्षण।
कर्म उपासना करिती जागली जाण॥२॥जय0।॥
आत्मज्ञान - फळे पाजळती वृक्षासी ।
ओळंगे ते सुख स्वर्ग लागे पायासी।॥
रिद्धी-सिद्धी घरी कामें करीती दासी।
तुकड्यादास म्हणे तोडी जन्म मरणासी॥ ३ ॥ जय0 ॥