सावध सावधान म्हणा मुखी राम राम।
आठवा आठवा रे, आठवा पांडुंरंग I
संसार दुःखरूप घेऊ नका त्याची भंग ॥
संत हे मायबाप साधा तयांचा संग।
उठा उठा झोप सोडा फेड आपुला पांग ॥ १ ॥
सावध सावधान म्हणा मुखी राम राम।
संसार करोनीया ठेवा मनी प्रभू-प्रेम ।। धृ० ॥
चौर्यांशी लक्ष योनी जीव फिरोनी आला ।
अवचित मनुष्याचा देह आजी मिळाला ॥
सद्बोध प्राप्त व्हाया पावली वेळ ही त्याला ।
दवडता काय वाया? काय न कळेतुम्हाला ?॥ सावध0 ॥२॥
होतील कर्म धर्म पावाल ते अंतकाळी ।
सांगेल चित्रगुप्त लिहिले असेल जे भाळी ॥
प्रगट की गुप्त कर्म ओकेल तो तदा सगळी ।
का भूल पावता ही दुख घेता कपाळी ॥ सावध० ॥३॥
आरक्त सूर्य झाला सत् संकल्प करा आता ।
जा उठा झोप सोडा भजा रुक्मिणीकांता ॥
त्याविना गति नाही मानवा न कुणी त्राता ।
तुकड्याची हाक ऐका सुख घ्याल तत्वता ॥ सावध०॥४ ॥