कलिकाल महात्म्य

राघो सांगे जागोपाशी वर्तमान । 
कलि हा येऊन दिन झाले ॥
करावया पाप काय आहे आता ?। 
कलिचा सिरस्ता ऐसा आहे ॥
मोठे मोठे वृक्षी नाड़ियेले तेणे। 
कायरे आपणे होते सांग ? ॥
तुकड्यादास म्हणे भोगाल रे जेव्हां । 
कळेल हे तेव्हां कलि कैसा ? ।

बिघडला धर्म कलियुगामाजी । 
वृत्ति झाली पाजी अंतरीची ॥
सुटली मर्यादा बंधने वेंदाची । 
हाव या मनाची अनावर ॥
विषयांचा जोर सुटला बाजारा । 
पळे सैरावैरा दाही दिशां ॥
तुकड्यादास म्हणे अगा नारायणा ! । 
सांभाळ या दीनां ऐशा तमीं ॥

धर्म सोडिले सर्वांनी । 
नाही वर्णाची निशाणी ॥
ब्राह्मण तो जोडे सिवी । 
संध्या चांडाळ शिकवी ॥
वेश्या करी पाटीलकी । 
सासू राहे सुने-धाकी ॥
तुकड्यादास म्हणे करा। 
करा कलिच्या विचारा ॥

नाही वर्णाश्रम-घडी । 
नाही ग्रह्मचर्य-जोडी ।
भलता घेतसे संन्यास । 
काळे लावितो धर्मास ।
करायाचे नेणे कोणी । 
सारे स्वार्थ- अभिमानी ॥
तुकड्या म्हणे काय झाले ? । 
काय देवा ! ऐसे केले  ? ॥

शूद्रा जानव्याची हौस ।
ब्राह्मण तो खातो मांस ।।
क्षत्रिय ते मोलकरी । 
वैश्य पाहती शिकारी ॥
मोळ्या आणती स्वासिनी । 
विधवा शृंगारे भूषणीं ॥
तुकड्यादास म्हणे गेला। 
सत्य-युगाचा चोचला ॥