अरे भूपतिनो ! भूमिदान यज्ञाला या साह्य देऊ मजुरांला
(चालः अरे बोलाना ! अन्याय कशास्तव... )
अरे भूपतिनो ! भूमिदान यज्ञाला या साह्य देऊ मजुरांला ॥धृo॥
ज्या गावाने आम्हास मोठे केले ते गाव भिकारी झाले ।
राहण्यास नसे झोपडीहि तणसाची करुनहि कष्ट उपवासी ।
अंगास नसे वस्त्र पुरे घालाया फाटकी दिसतसे काया ।
( अंतरा ) शिक्षणास पैसा नाही ।
रडतात मुले निरुपायी ।
नच कोणि साह्य त्या देई ।
या गरिबांची दैना ती बघण्याला सरकारहि अपुरा पडला ॥१॥
धन सौख्य नव्हे जहर असे साठविले गरिबाशोषुनि मिळविले ।
अम्हि एक सुखी पण गाव भिकारी झाले हे सौख्य आमुचे कसले ?
जे दुसऱ्यांना सुखवुनि सुख उपभोगी ते खरे
भूपति - योगी ।
( अंतरा ) या करु आजहि तसले ।
भूमिदान देऊनि अपुले ।
जव समान सगळे झाले ।
तो दिवस खरा सत्य - युगाचा आला लागुया याच कार्याला ॥२॥
जो कष्ट करी तोचि भूमिचा वाली सगळ्यास्तव संधि हि आली ।
ही देवांनी तषिनी आज्ञा केली ना कळली म्हणूनि न फळली ।
आजहि करुंया सुधारणा ही असली धन - भूमि देऊनी अपुली ।
(अंतरा) ग्रामीण राज्य करण्याला ।
हा उपाय सुंदर ठरला ।
सुख देऊ मिळुनि सर्वाला ।
गावातील हे उद्योगी जगण्याला संकल्य करु या अपुला ॥३॥
अम्ही गावकरी मिळुनी एकमताने नांदु या सर्व समतेने ।
जाती ने अम्हा पंथ न दुसरा कोणी मानवता आणि इमानी ।
दुर्व्यसनाला थारा न मिळे कुठुनी नच जुगार अश्लिल गाणी ।
( अंतरा ) या करु मिळोनी सगळे ।
काढून मनातिल काळे ।
करू आपणची निर्वाळे ।
तुकड्या म्हणे या पुण्य गांव करण्याला संकल्प फळवू हा अपुला ॥४॥
गुरुकुज दि. ०६-०७- १९५३