स्वातंत्र्य भारती आले आळशा !

(चाल: राजहंस माझा निजला...)
स्वातंत्र्य भारती आले आळशा ! ऊठ जागोनी ॥धृ०॥
उजळले भाग्य देशाचे का राहशी तू झोपूनी ?
आनंद मनी ना मावे गर्जती चहू बाजूंनी ।
गांधीच्या जयजयकारे ही दुमदुमली रे अवनी ।
( अंतरा )स्वातंत्र्य मिळुनि देशाला । जाहले वर्ष किती त्याला।
हा विजय शांतीचा झाला ।
लाग लाग तुही कामी आळशा ! ऊठ जागोनी 0॥१॥
या प्रिय स्वातंत्र्यासाठी जाहले किती बलिदान ।
लागले भिकेला कांही धन मान सर्व सोडून ।
कष्टला देशची सारा नच वस्त्र मिळेना अन्न ।
( अंतरा ) गेले ते दिवस दुःखाचे । असतिल ते जातिल साचे I
अति प्रेम कार्या नेत्यांचे ।
हो सज्जचि तू सजवोनी आळशा ! ऊठ जागोनी0 ॥२ ॥
या समाज - शिक्षेसाठी लागले कामी सरकार ।
किति गावी केंद्रे खुलली करितात प्रौढ सत्कार ।
जनतेत सभ्यता यावी हा विचार त्यांचा थोर ।
( अंतरा ) उद्योगि खेडि करण्याला । बलवान तरुण बनण्याला
सौंदर्य कला शिकण्याला ।
उघडले   नेत्र    सर्वांनी   आळशा ! ऊठ जागोनी0 ॥३॥
एक जात मानवतेची ही देशाची अभिलाषा ।
नच भिन्न पंथ देवादी नच भिन्न वेष आणि भाषा ।
सर्वांची हो समदृष्टी नच राव - रंक ही आशा ।
( अंतरा ) देशाचा सर्व पसारा । पुरुष हा कार्य करणारा ।
कर्तव्य - फळे घेणारा ।
तुकड्याचि हाक घे कर्णी आळशा ! ऊठ जागोनी0 ॥४॥