समाज - शिक्षण घ्यावयास तव बुध्दि येऊ दे पुढे

(चालः भक्तासाठी तो जगजेठी बसूनि...)
समाज - शिक्षण घ्यावयास तव बुध्दि येऊ दे पुढे ।
काढ हे अज्ञानाचे मढे ॥धृ0॥
भोळ्या भाळ्या शेतकऱ्या बहुमतेचि तुज नाडले ।
तुझ्या कष्टावर जग वाढले ॥
काहि कळेना लिहिता ये ना बसता ये ना भले ।
न शिकवुनि तुला पुरे नाडले ॥
भलभलती सांगुनी पुराणे अज्ञानी ठेविले ।
आंगठाछाप चि संबोधिले ॥
( अंतरा ) कळू देरे आता तरी देश आपुला I
हो साक्षर उत्तम राहणिने चांगला ।
ते समज हित - अनहित बुद्धिने भला ।
घे- शिक्षण घे शिक्षण अपुला समाज जेणे चढे ।
काढ हे अज्ञानाचे मढे 0 ॥१॥
उत्तम असणे गोड बोलणे चपल कार्यि शोभणे ।
तुला येउ दे सुंदरपणे ॥
शेत साजरे खता मुताने गायिबैल पाळणे ।
गोजिरे हत्तीसम देखणे ॥
दिसते छोटे मकान अपुले टापटीपही मने ।
दाखवी नटले सुंदरपणे ॥
( अंतरा ) या सर्व कलासी शिक्षणी पाहिजे ।
यामुळेचि लोकी पुढाकार घेइ़जे ।
जो सजे धजे चौघात राहतो मजे ।
भूषण हे देशाचे असले वळु दे खेड्याकडे ।
काढ हे अज्ञानाचे मढे 0 ॥२॥
असाच राहशिल वेड्यासम तरि कोणि पुसेना तुला ।
शीक रे एखादी तरि कला ॥
उद्योगाशी रत हो अपुल्या समझ रीतभात ही ।
वाढवू नको समाजी दुही ॥
जातपात ही सोड सोड म्हण मी मानव जन्मलो ।
आपुल्या कर्माने वाढलो ॥
( अंतरा ) ही दारु - गांजा - अफीम सारी नशा ।
सेवूच नको जी घरि आणि अवदशा ।
हो निर्व्यसनी या सोडूनि देऊनि विषा ।
सर्वांगिण उन्नति व्हाया घे साक्षरतेचे धडे I
काढ हे अज्ञानाचे मढे 0॥३॥
भारत देशासाठी देह हा देवाने निर्मिला ।
म्हणोनी इथेच तू जन्मला ॥
रक्षण करणे दीन जनांचे अबलांचेही तुला ।
म्हणोनी वाढवि अपुल्या बला ॥
देशाचा तू शूर शिपायी होउनिया वाढला ।
तरिच हा जन्म सफल जाहला ॥
( अंतरा ) या सर्वोदय - कार्यात लक्ष देऊनि ।
ही समाज - शिक्षा अंतरंगी सेवुनी ।
हो उत्तम साक्षर समजदार सद्गुणी ।
तुकड्यादास म्हणे तुज पाहुनि काळहि मागे दडे ।
काढ हे अज्ञानाचे मढे 0 ॥४॥